Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२७ जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची बैठक

 

मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी २७ जानेवारीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच काहीतरी मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळत आहेत. या बैठकीला महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ हे नेते उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

मात्र, कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नावर काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बेळगावातील हुतात्मा दिनापासून सीमाप्रश्नावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुतात्मा दिनी बेळगावात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोगनेळी टोलनाक्यावर रोखले होते.

त्यानंतर शिवसैनिकांनी बेळगावात कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकावण्याचा निर्धार केला होता. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी या शिवसैनिकांनी केली होती. त्यासाठी गुरुवारी शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले होते.

यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आता शिवसैनिकांनी गनिमी काव्याने बेळगावात शिरण्याचा चंग बांधला आहे.

Exit mobile version