Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२२ देशांमध्ये करोनाची तिसरी लाट

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगभरातील २२ देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीय. त्यात  प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून  आले आहेत .

 

भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. एका दिवसात भारतामध्ये सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

 

जगात  २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झालाय. तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केलीय. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना   कमी अधिक प्रमाणात लक्षणं दिसून येत आहेत तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

सध्या जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अंत्यंत वेगाने होत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जातेय.  अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने  प्रादुर्भाव होऊ लागलाय. जगभरामध्ये   दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्येच  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय आणि सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच कालावधीमध्ये झालेत. २१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने  रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या कालावधीत  लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक बाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.

 

अमेरिकेतील  बाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असं दिसून येतं की पहिल्या लाटेमध्ये येथे ८० हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येत एक हजार पटींनी वाढ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल तीन लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत.  ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार  रुग्ण आढळून यायचे ती संख्या ९७ हजारांहून अधिक झाल्याचे दुसऱ्या लाटेत पहायला मिळालं. आता येथे करोनाची तिसरी लाट आली आहे.

 

जपानमध्ये १०७ दिवसांनंतर ऑलम्पिक सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे  रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जपानमध्ये अडीच हजार नवे रुग्ण आढळून आल्याने देशात चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जपानचे आरोग्य मंत्री नोरीहिसा तामुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश व्हेरिएंटमुळे  प्रादुर्भाव वाढलाय. जपानमध्ये सोमवारी दोन हजार ४५८ नवे रुग्ण आढळून आले तर १० जणांचा मृत्यू झाला. शनिवारी नव्याने संसर्ग झालेल्यांचा आकडा दोन हजार ७०२ इतका होता.

 

युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा  मृत्यू झालाय. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसहीत पाच युरोपीयन देशांमध्ये एकूण  मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झालीय.  अमेरिकेमध्ये  मरण पावलेल्यांची संख्या पाच लाख ५५ हजार इतकी आहे. कोणत्याही देशात  झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागील तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

Exit mobile version