Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२०१५ पासून पंतप्रधान मोदींचा ५८ देशांचा दौरा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या काळातही संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेत गोंधळ उडाला असला तरी लेखी प्रश्न आणि उत्तरेदेखील सुरू आहेत. २०१५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी ५८ देशांचा दौरा केला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिली आहे. मोदींच्या ५ वर्षांच्या विदेश दौऱ्याची माहिती दिलीय. . २०१५ पासून पंतप्रधान मोदींच्या भेटीवर एकूण ५१७.८२ कोटी रुपये खर्च झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यांदरम्यान भारताने अनेक देशांशी महत्त्वाचे करार केले आहेत. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण यासह मोठ्या क्षेत्रांशी सामंजस्य करारही झाले आहेत. त्याच वेळी, आर्थिक विकासाच्या अजेंडावर राष्ट्रीय मोहिमांचा विस्तार केला गेलाय.

कोरोनाचे संकट आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही विदेश दौरा केलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीमधील भारत भेटीनंतर कोणत्याही बड्या विदेशातील नेत्याचा भारत दौरा झालेला नाही.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परराष्ट्र नेत्यांशी संपर्क साधत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांना संबोधित करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हा संवाद साधणार आहेत.

कोरोना संकटाच्या काळात भारताने १५० देशांना औषधे, वैद्यकीय उपकरणांची मदत दिली गेली आहे. चीनसह ८० देशांना ८० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इस्त्रायलकडूनही भारताला मदत मिळाली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौरे करून जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहेत. मोदींचे विदेश दौरे सेल्फी आणि स्वतःच्या प्रमोशनसाठी आहेत, असा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. गेल्या वर्षी जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी काँग्रेसने ट्विट करून मोदींवर टीका केली होती. या ट्विटमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर जाण्यासाठी विमानात चढताना आणि दौऱ्यावरून आल्यानंतर विमानातून उतरतानाचे फोटो शेअर केले होते. जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विटमध्ये लिहून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. यासोबत ‘NRI PM’ असा उल्लेख करत काँग्रेसने चिमटाही काढला होता.

Exit mobile version