Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, केंद्राकडे पाठपुरावा करा; नाना पटोलेंची मागणी

 

 

 

मुंबई: वृत्तसंस्था ।    २०  ते  ४५  वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याने राज्यात  १८  वर्षांवरील तरुणांना सरसकट कोरोनाची लस देण्यात यावी,  राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी   केली आहे.

 

१  एप्रिलपासून  ४५  वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे   सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

 

कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून  तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करतानाच जनतेनेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

. पोलिओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version