Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ तास काम , ४ दिवसांचा आठवडा ; नवा कामगार कायदा

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नवीन कामगार नियम लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. आठवड्यातील चार दिवस काम करुन तीन दिवस सुट्टी हवी असेल तर दिवसाला १२ तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. या  मंत्रालयाच्या सचिव अपूर्वी चंद्रा यांनी ही  माहिती दिली.

 

नवीन कामगार नियम  लागू झाल्यानंतर देशातील कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस कामावर बोलवण्याची मूभा असेल. म्हणजेच  परदेशाप्रमाणे भारतातही फोर डेज वीक सुरु करता येईल. त्याप्रमाणे कंपन्यांना राज्यस्तरीय विमा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन घेण्याची मूभाही देण्यात येईल.  आठवड्यातून चारच दिवस काम करण्याची सवलत देण्यात आली तरी आठवड्यात किमान ४८ तास काम करणं बंधनकारक असणार आहे.

 

“आम्ही कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मूभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे. काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे,” असे सांगत  नवीन नियमांप्रमाणे अंतिम मसुदा लवकर तयार होईल असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला आहे. हा मसुदा तयार करण्यामध्ये अनेक मोठ्या राज्यांनी हातभार लावल्याचंही चंद्रा यांनी स्पष्ट केलं.

 

“कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यामधील कामाचे दिवस हे पाच दिवसांपेक्षा कमी होऊ शकतात. चार दिवस काम केलं तर तीन दिवस सुट्टी दिली जाईल. यापूर्वीही आठवड्यामध्ये किमान ४८ तास काम केलं जावं अशी अट होती आणि ती आताही कायम ठेवण्यात आली आहे. कर्मचारी आणि कंपन्या या दोघांची सहमती असेल तर हे लागू करता येईल. मात्र हा नियम लागू केलाच पाहिजे असं कोणतही बंधन नसणार,” असंही चंद्रा यांनी सांगितलं आहे.

 

जून २०२१ पर्यंत असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार पोर्टलवर नोंदणी करु शकतात. ही नोंदणी केल्यानंतर या कामगारांना अनेक सुविधा पुरवल्या जातील. यामध्ये प्रवासी मजूर, प्लॅटफॉर्म कामगार आणि इतर क्षेत्रातील कामागारांचा समावेश असेल. नवे नियम बनवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली नवीन नियम बनवतानाही सर्व घटकांचा विचार केला जाईल. असं चंद्रा म्हणाल्या.

 

Exit mobile version