Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ आमदारांच्या नावांची फाईल राजभवनातून गहाळ आणि सापडलीही !

मुंबई : वृत्तसंस्था । एका माहिती अधिकारातून १२ विधान परिषद सदस्यांच्या नावांची शिफारस असलेली फाईलच राजभवनातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती नंतर फाईल सापडल्याचं राजभवनातून सांगण्यात आलं त्यामुळे राजकारण आणखीनच पेटलं आहे .

महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षातील १२ विधान परिषद सदस्यांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. पण, राज्यपालांकडून अद्याप या नावांना मंजूरी मिळालेली नाही. हा वाद आता न्यायालयात आहे. फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणात पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. त्यात तपास करण्याबद्दल सल्लाही द्यायला शिवसैनिक विसरले नाही.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राजभवनाकडे विचारणा केली आणि राज्यातील जुन्याच विषयाला पुन्हा नवी फोडणी मिळाली. लगेच शिवसेनेनं त्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच राजभवनातून फाईल गहाळ झाली असल्याची माहिती समोर आली. एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजभवनाने उत्तरं देताना हे सांगितलं. फाईल गहाळ झाल्याचं ऐकल्यानंतर शिवसेनेनं राजभवन आणि भाजपाचा समाचारच घेतला. त्यानंतर फाईल सापडली असल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं.

फाईल गहाळ झाल्याच्या वृत्तानंतर पुण्यातील शिवसैनिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याचबरोबर शोध घेण्यासाठी सल्लाही दिला. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची फाईल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र ती फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आता राजभवन येथे कोण कोण आले होते. हे राजभवन परिसरातील आजअखेर तेथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घ्यावा, जेणेकरून फाईलचा शोध लागण्यास मदत होईल, असं निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, आनंद दवे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. “आम्ही कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत जाणे शक्य नसल्याने, आम्ही पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले असून, तपास यंत्रणेच्याद्वारे त्या फाईलचा शोध घ्यावा,” अशी मागणी असल्याचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं.

 

Exit mobile version