Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

११ एप्रिलची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

 

मुंबई : वृत्तसंस्था । येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 

 

काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घावा, अशी मागणी केली जात होती.

 

या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.

 

राज्यात वाढू लागलेल्या   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अभ्यासावर होत आहे त्यातच काही परीक्षार्थींना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

 

या निर्णयाविषयी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विद्यार्थी घाबरले आहेत. पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याची अस्वस्थता होती. संवेदनाशील मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हा निर्णय घेतील आणि परीक्षा पुढे ढकलतील याची मला खात्री होती. आता तो निर्णय झाला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

 

 

 

दरम्यान, सर्वच स्तरातून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात असल्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version