Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे.

मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.

यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे”.

यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version