Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होम क्वारंटाईन नागरीक बाहेर फिरताना दिसल्यास पोलीसांना कळवा- जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, प्रतिनिधी । परदेशातून अथवा मुंबई व पुण्यातून अनेक नागरीक जिल्ह्यात आले आहे. यापैकी काही नागरीकांना होम क्वारंटाईनच्या सुचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहे. या नागरीकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना दिलेल्या असूनही असे कोणी नागरीक घराबाहेर फिरताना आढळल्यास नागरीकांनी त्याची माहिती नजिकच्या पोलीस स्टेशनला द्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी झाली आहे का याबाबतची खात्री करावी. तसेच मुंबई व पुण्याहून आलेल्या नागरीकांमध्ये कोरोना सदृश काही लक्षणे आढळून येत असल्यास त्यांचीही तातडीने तपासणी करावी. ज्या नागरीकांना होम क्वांरटाईन ठेवण्यात आले आहे त्यांनी बाहेर फिरु नये. परदेशातून आलेल्या सर्व नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागासाठी नोडल अधिकारी नेमले आहे. त्यांनी याबाबतची खात्री करावी. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात पायी व वाहनांनी आलेल्या नागरीक जिल्ह्याबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांची राहणे, खाणे, औषधे व इतर व्यवस्था संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी सामाजिक संस्थाच्या मदतीन शासनाच्यावतीने करावी.

पाल येथील चेकपोस्टच्या बाहेरील गावांतून काही नागरीक ये-जा करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याठिकाणी कडक तपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस व परिवहन विभागास दिल्यात. त्याचबरोबर एमआयडीसी मध्ये राजस्थानचे तर चोपडा तालुक्यात बडवाणी येथील काही नागरीक कामानिमित्त आलेले असून ते अडकून पडले आहे त्यांचीही व्यवस्था करावी. कोणीही गरीब व गरजू नागरीक उपाशी पोटी राहू नये यासाठी त्यांना आटा व तांदूळ उपलब्ध करुन द्यावे. भुसावळ मध्य रेल्वेच्यावतीने एक हजार फुड पॉकेट देण्याची तयारी दर्शविली असल्याने सामाजिक संस्थाऐवजी त्यांचेकडून जेवण उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करावे.

जळगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी होणारी गर्दी रोखण्यासाठी बाजार समितीस पंधरा खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरीकांना आवश्यक ते अन्न तातडीने उपलब्ध व्हावे याकरीता डॉमिनोज पिझ्झा या दुकानाला फक्त होम डिलीव्हरी देण्यासाठी परवागनी देण्यात यावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरीकांची तपासणी तातडीने करण्यात यावी. त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी. यासाठी तीनपाळीत वैद्यकीय अधिकारी नेमावे. ग्रामीण भागातील पेशंट उपजिल्हा रुगणालय, ग्रामीण रुग्णालयातच क्वारंटाईन ठेवण्यात यावे. आवश्यकता भासली तरच जिल्हा रुग्णालयात आणण्यात यावेत अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्यात.

ग्राहकानी बीलाची मागणी करावी
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जीवनावश्यक वस्तुंचे दुकानदार मालाची साठेबाजी करीत असून वाढीव भावाने माल विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनातर्फे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तथापि, नागरीकांनीही वस्तु घेतल्यानंतर बीलाची मागणी करावी. जेणेकरुन मुळ किंमतीपेक्षा जादा रक्कम घेणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करणे सोईचे होईल. तसेच अशा दुकानदारांवर गुन्हा दाखल करता यावा याकरीता प्रशासनातर्फे बनावट ग्राहक पाठविण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी घराबाहेर पडू नये. नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना केले आहे.

Exit mobile version