हॉटेलात दोन महिने राहून बिल न देता पसार झालेल्या मॅनेजरला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यातील एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून असल्याची बतावणी करत विश्वास संपादन करून हॉटेल महिंद्रा येथे वास्तव्यास राहून १ लाख ८९ हजार रुपयांचे बिल अदा न करता संशयित फरार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी संशयिताला मुंबईतून अटक करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौफुली जवळ असलेल्या हॉटेल महिंद्रा येथे  संशयित आरोपी मयूर अशोक जाधव (वय-३६) रा. गणेश ऑर्किड, गंगापूर रोड, नाशिक याने पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर असल्याचे सांगून १४ फेब्रुवारी ते १६ एप्रिल वास्तव्याला होता. या काळात हॉटेल मालक आणि कर्मचारी यांचा विश्वास संपादन केला.हॉटेलमधील रेस्टॉरंट व बिअर बारमध्ये दारू पिणे व जेवण इत्यादींच्या बिलापोटी त्याच्याकडे १ लाख ८९ हजार ५९० रुपये बिल निघाले. दरम्यान बिल न देता हॉटेलची रुम परस्पर सोडून संशयित आरोपी मयूर जाधव हा पसार झाला होता. याबाबत ९ मे रोजी हॉटेल मालक तेजेंद्रसिंग अमितसिंह महिंद्रा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी मयूर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर  एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक इम्रान सय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील हे मुंबईला रवाना झाले. पोलीसांनी तीन दिवस मुंबईला मुक्काम केल्यानंतर संशयित आरोपी मयूर जाधव याला अटक केली. त्याच्याकडून हॉटेल महिंद्राची बाकी असलेले १ लाख ८९ हजार ९५० रुपये हस्तगत केले आहे.  संशयित आरोपी मयूर जाधव याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील, महिला पोलीस नाईक नीलोफर सय्यद यांनी केली.

Protected Content