हॉटेलात दोन महिने राहून जेवणासह दारू रिचवली; बिल न देताच कंपनीचा मॅनेजर पसार

 जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका हॉटेलात तब्बल दोन महिने वास्तव्य केले. या काळात जेवण तसेच दारुही रिचवली. मात्र हॉटेलचे तब्बल पावणे दोन लाख रुपयांचे बिल न देता संबंधिताने हॉटेल मालकाची फसवणूक करून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयुर अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, १४ फेब्रुवारी २०२२ पासून ते १६ एप्रिल २०२२ रोजी पावेतो मयुर अशोक जाधव, (रा- प्लॅट नं. ०४, श्रीगणेश आर्किड, गंगापुररोड, रामेश्वरनगर, आनंदवल्ली, नासिक) याने पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे, अशी बतावणी करत हॉटेलातील एका खोलीत वास्तव्य केले. याच काळात त्याने हॉटेल मधील कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तसेच दारु तसेच जेवणही केले. या काळात हॉटेलचे १ लाख ८९ हजार ५९० रुपये बिल झाले. या बिलाबाबत त्यास हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले असता, मयुर जाधव याने चेक दिला मात्र तो वटला नाही. त्यानंतरही मयुरकडे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बिलाबाबत तगादा लावला. मात्र १६ एप्रिल रोजी मयुर जाधव हा हॉटेलातील खोलीची चाबी सोबत घेवून जात पसार झाला. त्याला वारंवार संपर्क साधला मात्र त्याने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर मयुर जाधव याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर हॉटेल मालक तजेंद्रसिंग अमितसिंग महिंद्रा (वय ६५ रा. जुनी जैन कंपनी, निमखेडी रोड, जुना हायवे रोड जळगाव) सोमवार, ९ मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मयुर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस नाईक ईम्रान सैय्यद हे करीत आहेत.

Protected Content