Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हैदराबादला न जाण्याच्या अटीवर वरवरा राव यांना अंतरिम जामीन

 

मुंबई : वृत्तसंस्था । गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता  शहरी नक्षलवाद  आरोपावरून   अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना त्यांच्या हैदराबादमधील घरी न जाण्याच्या अटीवर उच्च   न्यायालयाने  अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 

वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्या एस. एस. शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे स्पष्ट केले होते. आज  न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

 

राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत, असं उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे. सध्या त्यांना सहा महिन्यांचा जामीन देण्यात आला असून त्यानंतर त्यांनी शरणागती पत्करावी वा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करावा असं न्यायालयाने निकालामध्ये म्हटलं आहे. राव यांच्यावरील गुन्हा गंभीर असल्याने त्यांना अंतरिम जामीन देण्यात येत असला तरी त्यांना हैदराबाद येथील घरी जात येणार नाही, त्यांना विशेष न्यायालयाच्या परिसरातच राहावे लागेल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. त्यातूनच त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते, असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबियांतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता. त्यामुळे राव यांची वैद्यकीय स्थिती माहीत असूनही त्यांना अटकेत ठेवणे म्हणजे त्यांच्या जगण्याच्या आणि चांगल्या आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा दावाही करण्यात आला होता. राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कु टुंबियांतर्फे  करण्यात आली  होती.

 

राव यांच्यावर नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, सशस्त्र क्रांतीद्वारे सध्याचे सरकार उलथवून लावण्याचा कट अंमलात येण्यासाठी प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप आहे. शिवाय राव यांचे आजारपण हे वृद्धत्वाशी संबंधित असून त्यांना विशेष काळजीची गरज भासल्यास पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल. नानावटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार राव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा ‘एनआयए’ने  न्यायलयासमोर केला होता. मात्र न्यायालयाने प्रकृतीच्या कारणांमुळे राव यांना जामीन मंजूर केल्याने आता ते नानवटी रुग्णालयामधून पुन्हा तुरुंगात जाणार नाहीत.

Exit mobile version