Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हृदयरोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण !

संयुक्त राष्ट्रे: वृत्तसंस्था । गेली २० वर्षे हृदयरोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले असून सध्या हृदयरोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे समोर आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

मधुमेह आणि डिमेन्शिया हा दोन कारणेही पहिल्या दहामध्ये आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून २०१९ची जागतिक आरोग्य आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा मृत्यूच्या पहिल्या दहापैकी सात आजारांमध्ये समावेश होतो. इ.स. २०००मध्ये ही संख्या चार होती.

या नव्या आकडेवारीमध्ये २००० ते २०१९पर्यंतच्या कालावधीचा विचार करण्यात आला आहे. हृदयरोगामुळे सध्या जगातील एकूण मृत्यूंपैकी १६ टक्के मृत्यू होत आहेत. २०००मध्ये २० लाखांहून अधिक मृत्यू हृदयरोगाने झाले होते २०१९मध्ये ही संख्या ९० लाखांपर्यंत वाढली आहे. मधुमेह आणि डिमेन्शियामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. अल्झायमर्स आणि डिमेन्शियाचे अन्य प्रकार धोकादायक ठरत असून अमेरिका आणि युरोपमध्ये ते मृत्यूच्या कारणांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अल्झायमर आणि अन्य प्रकारच्या डिमेन्शियामुळे मरण पावणाऱ्यांमध्ये तब्बल ६५ टक्के महिलांचा समावेश आहे. २००० ते २०१९ या काळात मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. पुरुषांमध्ये ही वाढ ८० टक्के आहे. पूर्व भूमध्यसागरी प्रदेशात तर ही वाढ दुप्पट आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये मृत्यू आणि रोगग्रस्त होण्याचे प्रमाण पाहिल्यास जागतिक पातळीवर हृदयविकार, कॅन्सर, मधुमेह, श्वसनविकार यांसारख्या रोगांना प्रतिबंध करणे आणि त्यांवर उपचार करणे यावर गंभीर लक्ष देण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जाहीर झालेली नवी आकडेवारी आपल्याला असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध, निदान आणि उपचारांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याकडे निर्देश करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रायसस यांनी म्हटले.

Exit mobile version