Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली वृत्तसंस्था । हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढण्याची शक्यता असून केंद्र सरकार त्यादृष्टीने तयारी करत आहे. “पुढील दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे. अनेक सण येत असले तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करावंच लागेल,” असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर विनोद पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

“श्वसनामार्गे शरिरात प्रवेश करणारे विषाणू धोकादायक असून, कमीत कमी लोकांना संसर्ग व्हावा यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,” असं डॉक्टर विनोद पॉल यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “हिवाळा विषाणू आणि संसर्गासाठी प्रजनन काळ असतो. जगभरात दुसरी लाट आली आहे हे आपण विसरता कामा नये. जसजसा हिवाळा जवळ येत आहे आम्हीदेखील या विषाणूंच्या इतर गंभीर प्रकारांचे शोध घेत आहोत”.

“हीच ती वेळ आहे कारण हिवाळ्यात श्वसनामार्ग होणाऱ्या संसर्गात वाढ होते. कोरोनाच्या बाबतीत ही धोक्याची घंटा आहे,” असं डॉक्टर विनोद पॉल यांनी म्हटलं आहे. याआधी हंगामबदल कोरोनाचा फैलाव होण्यासाठी मदतशीर ठरत असल्याचं समोर आलं आहे. लोकांनी हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी असं आवाहन तज्ञांनी केलं आहे.

Exit mobile version