हिंदू-मुस्लीम वाद ब्रिटीशांनीच सुरू केला : भागवत

मुंबई प्रतिनिधी | भारतातील हिंदू आणि मुस्लीमांचे पूर्वज एकच असून ब्रिटीशांनी स्वार्थासाठी दोन्ही धर्मांमध्ये फूट पाडली असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वतोपरी या कार्यक्रमात बोलत होते.

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी या  कार्यक्रमात संबोधित करताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचं वातावरण निर्माण केलं. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केलं. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असं सांगितलं गेलं. पण तसं झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचं स्थान आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केल्याचा आरोप मोहन भागवत यांनी केला आहे. 

दरम्यान, समजूतदार मुस्लिम नेत्यांनी कट्टरतावाद्यांविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरचा आहे. याचा अर्थ इतर विचारांचा सम्मान न करणं असा होत नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्व नव्हे, तर भारतीय वर्चस्वाबाबत विचार करणं गरजेचं आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अतिशय महत्त्वाचं असल्याचे मोहन भागवत यांनी नमूद केले.

Protected Content