Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई; एका दिवसात १०६ गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत ७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून २७ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण), तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.

हातभट्टी निर्मूलन मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४० व पोलीस विभागाने ६६ असे एकूण १०६ गुन्हे नोंदविले आहेत. १०० जणांना अटक करण्यात आली आहे. ६ जण फरार आहेत. यात रसायन – ४४,७४८लीटर, गावठी दारू- ४१६४ लीटर, देशी दारू २७.१८ लीटर, विदेशी मद्य ८.६४ लीटर, बियर १३ लीटर, १ दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे ‌ यात मुद्देमाल किंमत २७ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील सामरोद येथे गावठी हातभट्टी फोडण्यासाठी थेट अधीक्षक व्ही.टी.भूकन त्यांच्या पथकासह पोहचले होते. यामध्ये अवैध गावठी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यावर एकूण ४ गुन्हे दाखल करत ४७४० लिटर रसायन तसेच ९० लिटर तयार गावठी दारू असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चाळीसगाव येथील निरीक्षक आर. जे.पाटील तसेच पाचोरा विभागाचे विलास पाटील यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील,विजय परदेशी,संतोष निकम,मुकेश पाटील,विपुल राजपूत यांनी मिळून ही कारवाई केली.

मागील ४ महिन्यात हातभट्टी सह अवैध मद्यविक्रीवर मोठया प्रमाणत कारवाई करण्यात आली असून ३ सराईत आरोपींना एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध मद्य विक्रीवरील कारवाईचे सत्र आगामी काळात ही चालूच राहणार आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version