“हर हर महादेव” गजर करीत शोभायात्रेत भाविकांचा उत्साह 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री महाशिवपुराण कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. श्री महाशिवपुराण कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले. गणेशवाडी येथील  श्री महाशिवपुराण कथेचा गुरुवारी समारोप झाल्यावर संध्याकाळी ग्रंथाची दिंडी भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली.

शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्री दत्त मंदिर परिसरात महानगर पालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका मंगला संजय चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्यदिव्य श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी कथावाचन समाप्ती झाली. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले. कथा सुश्राव्य होण्यासाठी हभप देवदत्त महाराजांना हार्मोनियमवर कैलास परदेशी, ऑक्टोपॅडवर तुषार निंबाळकर, ढोलवर प्रकाश अहिरे, तबलावर राजू देशपांडे यांनी साथसंगत केली.  गायक भगवान निंबाळकर यांनी भक्तिगीते म्हटली.

दुपारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही. शोभायात्रेत महिला भाविकांनी मंगलकलश घेऊन लक्ष वेधून घेतले होते तर लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. आज प्रदोष तिथी असल्यामुळे या शोभायात्रेला विशेष महत्त्व होते. यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी दिंडीचे फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत करण्यात आले. मार्गात सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

शोभा यात्रेत सुहास-सपना चौधरी यांच्या डोक्यावर श्री शिवमहापुराण कथेचा ग्रंथ ठेवण्यात आला होता. या ग्रंथाचे फुलांच्या वर्षावात भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. ज्या भाविकांना, शिवभक्तांना कथाश्रवण करता आली नाही, त्यांच्या भेटीसाठी भगवंत त्यांच्या दारापर्यंत जातात अशी यामागे श्रद्धा आहे. ग्रंथाचे भाविकांनी ठिकठिकाणी पूजन करीत स्वागत केले. शोभायात्रेच्या मार्गात हभप देवदत्त महाराजांनी आशीर्वाद दिले. भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करीत शेकडोंच्या संख्येने लक्षणीय सहभाग घेतला.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी भगवान महादेवांच्या भक्तिगीतांवर जल्लोष केला. दिंडी गणेश वाडी, जानकी नगर, कासमवाडी, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामार्गे कथेच्या ठिकाणी दत्त मंदिराजवळ समाप्त झाली. शुक्रवारी २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता काल्याचे किर्तन होऊन दुपारी महाप्रसाद होणार आहे. भाविकांच्या आग्रहास्तव पुढील वर्षी २ डिसेंबरला पुन्हा श्री रामायण संगीतमय कथा आयोजित करण्याचा गणेशवाडीतील नागरिकांनी यावेळी संकल्प केला आहे.

Protected Content