Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीविठ्ठल नगरात विजेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । पिण्याचे पाणी भरत असतांना विद्यूतपंपामुळे विजेचा जोरदार धक्क्याने ५६ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी हरीविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, हरीविठ्ठल नगरातील जुना आठवडे बाजार परिसरात प्रकाश रामधन पवार (वय-५६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. पत्नी धुणीभांडीचे काम करत असल्याने त्या कामासाठी नेहमीप्रमाणे गेलेली होती. घरी पवार तसेच त्यांची वृध्द आई हे दोघेच होते. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी 11.30 वाजेच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यामुळे पवार यांनीच पाणी भरण्यासाठी मोटार लावली. मोटार लावण्यानंतर काही वेळाने मोटारीची नळी निघाली. ती पुन्हा मोटारीला लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. शेजार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या परिसरात पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी घटनास्थळ गाठले. व तत्काळ प्रकाश पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जामनेर तालुक्यातील भराडी येथील मूळ गाव असलेले प्रकाश रामधन पवार हे गेल्या दहा ते 12 वर्षापासून जळगावातील हरिविठ्ठल नगरात जुना आठवडे बाजार परिसरात स्थायिक झाले होते. त्यांचे हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी शालीनी, आई, सखुबाई व मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा त्यांचा परिवार आहे. शुभम हा पुण्याला वास्तव्यास आहे. तर राजेंद्र पवार यांचेही हरिविठ्ठल नगरात सलूनचे दुकान आहे.

Exit mobile version