Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हनुमान मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीचे दातृत्व ; ८० लाखांची जमीन दान

बंगळुरु : वृत्तसंस्था । येथील एका मुस्लीम व्यक्तीने स्वत:च्या नावावर असणारी दीड गुंठा जमीन हनुमान मंदिर उभारण्यासाठी दान केली आहे. या जमीनीची किंमत आजच्या बाजारभावानुसार ८० लाख ते एक कोटींच्या दरम्यान आहे.

एच. एम. जी. बाशा असं या दानशूर व्यक्तीचं नाव असून सध्या त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची बंगळुरुमध्ये चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी बाशा यांचा हा निर्णय धार्मिक एकात्मता दाखवणारा असल्याचं म्हणत त्यांच कौतुक केलं आहे.

बाशा हे एक व्यापारी आहे. मालाची ने आण करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. बंगळुरु ग्रामीण जिल्ह्यातील होसाकोटे तालुक्यामध्ये बाशा यांच्या कुटुंबाची तीन एकर जमीन आहे. या जमीनीचा काही भाग हा वेलागेलेपुरा येथील एका छोट्या हनुमान मंदिराला लागून आहे. मागील तीस वर्षांपासून हे हुनामानचं मंदिर येथील हिंदूंसाठी एक महत्वाचं प्रार्थनास्थळ म्हणून ओळखलं जातं. मात्र या मंदिरामध्ये पूजा करुन झाल्यावर प्रदक्षिणा घालताना कमी जागेमुळे भक्तांना अडचण निर्माण होते असं बाशा यांच्या लक्षात आलं.

“याच कालावधीमध्ये गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी त्यांना जमीन कमी पडत असल्याचे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी आमच्या तीन एकर जमीनीपैकी मंदिरासाठी दीड गुंठा जमीन देऊ केली. गावकऱ्यांची सोय व्हावी या हेतूने मी जमीन देण्याचा निर्णय घेतला,” असं बाशा यांनी सांगितलं.

बाशा यांनी जेवढी जमीन दान दिली आहे त्यापैकी केवळ एक टक्का जमीन मंदिरासाठी गरजेची होती. मात्र बाशा यांनी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या पाहून मंदिराचा विस्तार थोडा अधिक करण्याच्या हेतूने जास्त जमीन दान देण्याचा निर्णय़ घेतला.

“माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. आज आपण सर्वजण जिवंत आहोत उद्या नसू. आपल्या आयुष्यामधील अनिश्चितता कायम आहे. असं असतानाच एकमेकांबद्दल द्वेष परसवून आपल्याला काय मिळणार आहे? आपल्या हातून समाजहिताचे काम घाडवे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मी ही तसाच प्रयत्न केला आहे,” असं बाशा सांगतात.

Exit mobile version