Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वामित्व योजनेची सुरूवात

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. सुरुवात केल्यानंतर १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.

पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमुळे ६ राज्यांमधील ७६३ पंचायतींच्या एक लाख लोकांना लाभ मिळणार आहे. यात उत्तर प्रदेशातील ३४६, हरयाणातील २२१, महाराष्ट्रातील १००, मध्य प्रदेशातील ४४, उत्तराखंडातील ५० आणि कर्नाटकातील २ पंचायतींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केल्यानंतर ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असा लोकांशी वार्तालाप केला. आता आपल्या संपत्तीवर कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे आता लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे, अशी लाभार्थ्यांची भावना आहे. या कार्डाद्वारे आता आम्हाला बँकांकडून कर्ज मिळवणे अगदी सहज सोपे झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांच्यासी वार्तालाप करताना लाभार्थी म्हणाले. गावांमधील संपत्तीचा वादही आता संपुष्टात आल्याचे ते म्हणाले.

आज ज्या १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, ते लोक आपण आता शक्तीवान झाल्याचे अनुभवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेमुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात ऐतिहासिक बदल होतील असेही पंतप्रधान म्हणाले. घर तुमचे आहे आणि ते तुमचेच राहणार आहे, हे निश्चित होणार आहे. ही योजना गावांमध्ये ऐतिहासिक बदल करणार आहे, असे मोदी म्हणाले.

Exit mobile version