Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वबळाच्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला मिश्कील टोला

 

मुंबई : वृत्तसंस्था ।   “बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू,” असा टोला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. दरम्यान नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचं तसंच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याचं वक्तव्य लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत केलं. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असताना स्वपक्षाच्या सरकारवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली असून टोला लगावला आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  त्यावेळी ते बोलत होते

 

“चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,” असं मिश्कील भाष्यही यावेळी त्यांनी केलं.

 

“माझी आतापर्यंतची राजकीय कारकिर्द काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधातील आहे. जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेचं पडलं होतं. पण याचा अर्थ विरोधक होतो म्हणून तुम्ही केलं ते सगळं वाईट असं नाही. शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची अशी भूमिका कधीच नव्हती,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

 

“माझा कोणीतरी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. आता तशीच पद्धत पडली आहे. पण मीच लोकप्रिय आहे असा गैरसमज होता कामा नये. सर्वांची कामं मिळून मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय करतात. मुख्यमंत्री लोकप्रिय म्हणजे सरकार लोकप्रिय आहे. याचा अर्थ माझं मंत्रिमंडळ योग्य काम करत आहे. सरकार म्हणजे फक्त मंत्री नाही, सचिव, अभियंतेदेखील आले,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं.

 

Exit mobile version