Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या पोलिसांना वाचवा- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । खरे कोरोना योध्दे असणार्‍या पोलिसांना कोरोनाने ग्रासल्याबद्दल चिंता व्यक्त करत स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या पोलिसांना वाचवण्याचे आवाहन आज शिवसेनेने केले आहे. या माध्यमातून गृहखात्याची जबाबदारी असणार्‍या राष्ट्रवादीला टोला मारण्यात आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पोलिसांना होणार्‍या कोरोनाच्या संसर्गाबद्दल भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, कोणी काही म्हणोत, पण निदान महाराष्ट्रात तरी खरे कोरोना योद्धे हे पोलीस, डॉक्टर्स व परिचारिका आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे व योद्ध्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राज्यभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पंचवीस हजारांवर पोहोचला आहे व त्यात पोलिसांची संख्या १ हजार २५ वर जाऊन पोहोचली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या चोवीस तासांतच २२५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात १०६ अधिकारी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापुरात कोरोनाग्रस्त पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. पोलिसांना उसंत नाही, विश्रांती नाही, ते अहोरात्र झुंज देत आहेत. मुंबईच्या पोलिसांनी भल्याभल्या गुंडापुंडांना सरळ केले आहे. अनेक चोर-लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. हिंस्र दंगलखोरांना आपले पोलीस बेडरपणे सामोरे गेले आहेत. प्रसंगी जीवाची बाजी लावली आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य नेहमीच चोख बजावले आहे. तरीही कोरोनासारखा एक विषाणू पोलीस खातेही हतबल करताना दिसत आहे. कोरोना विषाणू पोलिसांच्या शरीरात घुसतोय व त्यांचा बळी घेतोय.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पोलिसांसारख्या मजबूत संस्थांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होणे, त्यातून या दलाचे मनोधैर्य खचणे महाराष्ट्राच्या परंपरेस परवडणारे नाही. पोलीस खाते हे राजकारण्यांसाठी दरारा निर्माण करणारे आहे, पोलिसांना चिरीमिरी लागते आदी आरोप करणे सोपे आहे. डहाणूच्या साधू हत्याकांडात सगळ्यात जास्त सोसावे लागले ते पोलिसांनाच. कुठे काही खट्ट वाजले तरी पोलिसांना सरळ धोपटले जाते, पण आज तोच पोलीस जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढतो आहे. अनेक ठिकाणी कोरोनाने मरण पावलेल्यांना खांदा द्यायला त्यांच्याच आप्त, मित्र परिवाराने नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्या कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार केले. अशा पोलिसांचे मनोबल वाढवायला हवे. पोलिसांना वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अभिनेता जितेंद्र जोशी याने कोरोना रणातील झुंजार पोलिसांना मानवंदना देणारे एक गाणे रचले व लोकांसमोर आणले ते उत्तमच आहे. कोरोनाशी लढताना महाराष्ट्रात एक हजारावर पोलिसांना कोरोना विषाणूने घायाळ केले. त्यातले काही हे जग सोडून गेले आहेत, त्या वीरांना प्रणाम! कोरोनाच्या लढाईत जनतेला वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या पोलिसांना वाचवायला हवे! असे यात म्हटले आहे.

Exit mobile version