‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत महापालिकेतर्फे जळगावात कचरामुक्त अभियान सुरू;

जळगाव प्रतिनिधी | कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला ‘थ्री स्टार रेटिंग’ हा पुरस्कार मिळाला. याच अभियांतर्गत पुढचे पाऊल म्हणून महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

केंद्र शासनातर्फे संपूर्ण भारतात राबविल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयूए) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव-2021’ अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहरांना सर्वांत स्वच्छ असल्याबाबतचा वर्ष 2021 करिता पुरस्कार प्रदान केला. यामध्ये कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला थ्री स्टार रेटिंग हा पुरस्कार मिळाला. याच अभियांतर्गत पुढचे पाऊल म्हणून महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत शहरातील ज्या भागातील कॉलनी परिसर अथवा तेथील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवासी दररोज घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण (बोअरवेल रिचार्ज) असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवतील आणि ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेकडे सांगतील त्यांचा सन्मान करू, असे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री महाजन यांनी जाहीर केले होते.

त्या अनुषंगाने सर्वेक्षणांतर्गत पात्र ठरलेल्या शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागातील रहिवाशांचा महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका उपायुक्त तसेच अधिकार्‍यांना आज बुधवार, दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी सोबत तेथे घेऊन जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात रहिवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संबंधित ठिकाणी ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असा फलकही लावण्यात आला. महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, पवन पाटील, लोमेश धांडे, रमेश कांबळे, श्री.बडगुजर, या भागातील नगरसेविका सिंधुताई कोल्हे, पार्वताबाई भिल, नगरसेवक प्रा.सचिन पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागासह आणखी आठ-दहा कॉलन्यांतील रहिवाशांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा आदर्श शहरातील प्रत्येक सोसायटी, अपार्टमेंट तसेच कॉलनी परिसरातील रहिवाशांनी डोळ्यासमोर ठेवून आपण दररोज कचरा विलगीकरणासह घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण (बोअरवेल रिचार्ज) असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवावेत. त्यानंतर या अभियानांतर्गत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल महापालिकेतर्फे केंद्र व राज्य सरकारकडे पाठविला जाऊन जळगाव शहर संपूर्णपणे कचरामुक्त होऊन केंद्र व राज्य सरकारचा पुरस्कार आपल्या महापालिकेस नक्कीच प्राप्त होईल, असे आवाहन यावेळी महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी केले.

तसेच ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेस कळविणार्‍या रहिवाशांचा त्या-त्या भागात जाऊन सन्मान करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील. कुणीही रस्त्यावर कचरा न टाकता त्याचे विलगीकरण करून तो घंटागाडीतच टाकावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Protected Content