Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वच्छतेमुळे ” शावैम” चा जागतिक सन्मान झाल्याने आनंद – पालकमंत्री

जळगाव, प्रतिनिधी । “गोरगरीब जनतेचे सिव्हिल हॉस्पिटल” अशी ओळख असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने स्वतःची ओळख वर्षभरात बदलवली असून येथील सुशोभीकरण आणि स्वच्छता आता जागतिक पातळीवर पोहचली आहे.

जागतिक संस्थेने दिलेल्या या बहुमानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे जळगावचा नावलौकिक वाढला आहे, असे गोरवाद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण व रंगरंगोटीची दखल घेऊन जागतिक पातळीवर फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेने “फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड” हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. सुशोभीकरणासाठी ज्या कलाकार व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांना शुक्रवार दि १८ जून रोजी  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयात एकूण १०.१९९ चौरस फूट भिंत रंगवण्यात आली आहे. प्रमाणपत्रावर संस्थापक व अध्यक्ष वीरेन लोटस यांची स्वाक्षरी आहे.

यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  एन.  एस.  चव्हाण,  उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत डॉ रामानंद यांनी सांगितले की, स्वच्छता व टापटीपपणा याला आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असून या रुग्णलयात येणार प्रत्येक रुग्ण येथील स्वच्छतेमुळेच ५० टक्के बरा होतो. या सुशोभीकरणासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे असून काटे दाम्पत्याचे आभारी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्याधिकारी राऊत यांना कर्तव्यपूर्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना जागतिक दखल घेतली गेल्याने महाविद्यालय व रुग्णालयाचे सन्मानपत्र देऊन गौरव केला. तसेच परिसरात रंगरंगोटी करून देणारे कलाकार व कर्मचाऱ्यांचा सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी पालकमंत्री ना पाटील म्हणाले की, रुग्णालयातील सुशोभीकरण व स्वच्छता कायम टिकून राहावी यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी कायम प्रयत्न ठेवले पाहिजे. या रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी आणणे, त्यांना मदत करणे हे मी केले  आहे.  या सेवेतूनच मी लोकप्रतिनिधी झालो आहे. रुग्णालयात समाजसेवा करायला मिळणे, हे गौरवाचे काम आहे. देशपातळीवर बदनाम झालेले नाव आता गौरवाने घेतले जात असल्याने या जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणले की, काम करताना चुका होतात.  मात्र त्या चव्हाट्यावर न आणता समजूतीने सांगून कामकाजामध्ये पारदर्शकता आणून बदल घडविले, ही अधिष्ठाता डॉ रामानंद यांची काम करण्याची शैली मला भावली, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी तर आभार जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी यांनी मानले. यावेळी उप वैद्यकीय अधीक्षक डॉ संगीता  गावित, डॉ विलास मालकर, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ जितेंद्र सुरवाडे, डॉ इम्रान पठाण, डॉ वैभव सोनार, डॉ बाळासाहेब सुरोशे, डॉ. सतीश सुरळकर, अधिसेविका प्रणिता गायकवाड, यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पथनाट्याद्वारे जनजागृती

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिष्ठाता कार्यालयासमोर कलावंत विनोद ढगे आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगणारे पथनाट्य सादर केले. स्वच्छतेमुळे आजार दूर राहतात, निरोगी स्वच्छता महत्वाची आहे, असे पथनाट्यातून सांगत जनजागृती केली. दिशा बहुउदेशीय संस्थेचे विनोद ढगे यांच्यासह सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलाल यांनी पथनाट्य सादर केले.

यांचा झाला सन्मान    

त्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते परिसरात रंगरंगोटी करून देणारे कलाकार व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रंगरंगोटी करून देणारे कलाकार प्राचार्य डॉ. अविनाश ज्ञानदेव काटे,  प्रा. डॉ. वैशाली अविनाश काटे, अविवा अविनाश काटे, हर्षल कदम, सत्यनारायण पवार, सुशोभीकरणात अनमोल सहकार्य करणारे साई मल्टी सर्व्हिसेसचे व्यवस्थापक प्रविणसिंग पाटील, कंत्राटी कर्मचारी राहुल राजेंद्र सपकाळ, आरिफ बाबू पठाण, प्रमोद सुरेश कोळी,  लक्ष्मण बारकू मिस्तरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी प्रकाश चंद्रकांत सपकाळ, राकेश मारोती सोनार, अनिल नारायण बागलाणे,  सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय बन्सीधरराव गायकवाड यांचा समावेश होता.

Exit mobile version