Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टेट बँक ऑफ इंडियाही मागच्या दाराने कर्मचारी कपातीच्या मार्गावर

नवी दिल्ली वृत्तसंस्था  ।  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देऊ शकते. एसबीआयने स्वेच्छानिवृत्ती योजना आणण्याचा विचार केला आहे. या योजनेत ३० हजार १९० कर्मचाऱ्यांचा समावेश असू शकतो. ‘सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस २०२०’ असे या योजनेचे नाव असणार आहे..

स्टेट बँकेच्या विविध शाखा व कार्यालये मिळून कर्मचारीसंख्या मार्चअखेर २.४९ लाख आहे. गेल्यावर्षी मार्चअखेर ही संख्या २.५७ लाख होती. यापैकी पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेचा आराखडा तयार असून तो संचालक मंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

स्वेच्छानिवृत्तीखेरीज ज्या कर्मचाऱ्यांना बँकेत सर्व प्रकारचे लाभ मिळाले आहेत, ज्यांना नोकरीत यापुढे राहण्यात वैयक्तिक समस्या येत आहेत त्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठीही सन्माननीय तोडगा बँकेने देऊ केला आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना बँकेत २५ वर्षांची नोकरी झालेल्या किंवा वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असणार आहे. ही योजना १ डिसेंबरपासून पेब्रुवारी २०२१ पर्यंत खुली राहणार आहे.

जे कर्मचारी या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांना त्यांच्या नोकरीच्या राहिलेल्या काळासाठी ५० टक्के वेतन सानुग्रह रक्कम म्हणून दिले जाणार आहे. या योजनेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा सेवेत यायचे असेल तर तो मार्ग खुला राहणार आहे. यापूर्वी स्टेट बँकेने २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली होती.

Exit mobile version