Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टेट बँकेच्या एटीएमवर आता २४ तास ओटीपी सुविधा

मुंबई : वृत्तसंस्था / भारतीय स्टेट बँकेने स्वतःच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू केलेल्या ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) आधारित सुविधेची व्याप्ती वाढवली आहे. आता येत्या शुक्रवारपासून ही सुविधा अहोरात्र उपलब्ध होणार असल्याची माहिती स्टेट बँकेने मंगळवारी दिली. यामुळे १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम बँकेच्या एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी आधारित सुविधा १८ तारखेपासून २४ तास मिळणार आहे.

ही सुविधा वापरण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक बँकेकडे नोंदवावेत किंवा पूर्वीचे क्रमांक बदलले असतील, तर ते अद्ययावत करावेत, असे आवाहनही बँकेने केले आहे. कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांचे आर्थिक गैरव्यवहारांपासून संरक्षण करणे; अनधिकृत व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी बँकेने ही ओटीपी आधारित सुविधा चोवीस तास पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी १ जानेवारी २०२० रोजी स्टेट बँकेने ओटीपी आधारित एटीएम सेवा सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तासांसाठी सुरू केली होती.

ही सुविधा अहोरात्र केल्यामुळे एटीएममधील सुरक्षा यंत्रणाही अधिक प्रभावी करता येणार आहे. असे बँकेच्या रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले.

ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्या डेबिट कार्डधारकांसाठीच असून या सुविधेअंतर्गत १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढता येणार आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळी ग्राहकाला त्याच्या डेबिट कार्डाचा पिन क्रमांक टाकल्यानंतर त्यासोबत ओटीपीदेखील टाकावा लागणार आहे. हा ओटीपी ग्राहकाच्या मोबाइलवर बँकेतर्फे पाठवला जाणार आहे. एटीएम यंत्रात डेबिट कार्ड घालून पिन टाकल्यावर नेमकी किती रक्कम काढायची ते टाइप केल्यावर एटीएम यंत्राकडूनच ओटीपीची मागणी केली जाणार आहे.

Exit mobile version