Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला रेल्वे नेटवर्कद्वारे जोडलं

 

अहमदाबाद : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला या रेल्वे केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत.

केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे.रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पाहण्यासाठी पर्यटकांना सहज येता येणार आहे.

या उद्घाटनाप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची उपस्थिती होती या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. गुजरातमधील पर्यटनास चालना मिळणार आहे. या अगोदर स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर रेल्वेस्थानकावर पोहचावे लागत होते.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.यापूर्वी अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता. अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा पुतळा उभारण्यात आला आहे.

Exit mobile version