Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमवारपासून शहरातील मार्केटमधून होम डिलिव्हरी सुरु करण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांचे व सुचनांचे पालन करुन फक्त होम डिलीव्हरी देण्याच्या अटीवर जळगाव शहरातील मार्केटमधील दुकाने दुपारी 12 ते 4 या वेळेत सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यास सर्व व्यापारी वर्गाने संमती दिल्याने येत्या सोमवारपासून शहरातील मार्केटमधील दुकाने सुरु करण्यात येणार आहे.

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील कॉम्प्लेक्सधील दुकाने गेल्या चार महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना मध्यस्थी करुन तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार यावर चर्चा करण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपायुक्त वावळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अभिषेक पाटील यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून शहरातील मार्केट बंद आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्र बंद झाले आहे. कामगारांचे पगार, कौटूंबिक खर्च कसा पेलायचा तसेच दुकानामधील अनेक मालाची एक्सापरी संपल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान आदि बाबी लक्षात घेता दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी व्यापारी वर्गाने या बैठकीत केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या शहरांमधील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहे. त्यातच जळगाव शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी नुकताच सात दिवसांचा लॉकडाऊनही करण्यात आला होता. पुन्हा सर्व मार्केट सुरु केले तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल ही बाब जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी व्यापारी वर्गाच्या लक्षात आणून दिली.

व्यापारी हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. जिल्ह्यातील आर्थिेक उलाढाल सुरु राहिली पाहिजे तसेच व्यापाऱ्यांचे नुकसान होवू नये. याकरीता पहिल्या टप्प्यात सम व विषम तारखेस दुपारी 12 ते 4 या वेळेत दुकानदारांना होम डिलीव्हरी देण्यास परवानगी देण्याचा पर्याय पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यापाऱ्यांना सुचविला. त्यास सर्व व्यापाऱ्यांनी संमती दिल्यानंतर याबाबतचे स्वयंस्पष्ट आदेश येत्या दोन दिवसात काढण्यात येवून येत्या सोमवारपासून शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले.
शहरातील दुकाने सुरु झाली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुकानांमध्ये प्रत्यक्ष न येता फोनद्वारे ऑर्डर देऊन होम डिलिव्हरी मिळवावी. जेणेकरुन शहरात गर्दी होणार नाही तसेच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी नागरीकांना केले आहे.

Exit mobile version