Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

Exit mobile version