Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस खासदारांची उद्या बैठक

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  देशातील कोरोनाची विदारक स्थिती पाहता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोरोनास्थितीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

 

कोरोनामुळे देशातील स्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचं दिसत आहे. रोजच रुग्णांचा आकडा नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर विरोधकांनी टीका केली आहे. स्थिती हातळण्यास केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरल्याचं टीकास्त्र विरोधकांनी सोडलं आहे.

 

यापूर्वी काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. केंद्राकडून भाजपा शासित राज्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

 

भारतात दोन लस उत्पादक कंपन्यांनी लशींसाठी वेगवेगळ्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र सरकार केवळ मूकदर्शक बनले. लस उत्पादकांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यापूर्वी केली आहे.

 

Exit mobile version