Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरक्षेच्या नावाखाली कैदच ; मुक्त करा

लखनऊ : वृत्तसंस्था । हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबान अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतलीय. पोलीस प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे आपल्याच घरात कैदेत ठेवण्यात आल्याचं म्हणत पीडित कुटुंबानं या कैदेतून सुटका करण्याची मागणी करत अर्ज दाखल केलाय.

पोलीस प्रशासनानं घातलेल्या बंदीमुळे कुटुंबाला मोकळ्या वातावरणात श्वासही घेता येत नाही. लोकांना भेटण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असावं आणि आपलं म्हणणं मोकळ्या पद्धतीनं मांडता यावं, अशी मागणी करणारा अर्ज पीडित कुटुंबानं न्यायालयासमोर दाखल केलाय.

बंदीमुळे लोकांना आम्हाला भेटताही येत नाही. मोकळेपणानं आपलं म्हणणंही मांडता येत नाही. घराबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आलीय. न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंबावर लादण्यात आलेली ही बंदी हटवणं गरजेचं असल्याचं या अर्जात म्हटलं गेलंय.

याचिकाकर्ते सुरेंद्र कुमार यांनी केलेल्या दाव्यानुसार, पीडित कुटुंबाकडून हा अर्ज दाखल करण्यात आलाय. पीडित कुटुंबानं फोन करून आपल्याकडे कोर्टाच्या हस्तक्षेपाची मागणी केल्याचं सुरेंद्र कुमार यांनी म्हटलंय. तत्काळ सुनावणी करण्यात यावी, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.

पीडित मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबाला दिलेल्या वागणुकीवरून स्थानिकांत रोष आहे. राजकीय वळणामुळे उत्तर प्रदेश सरकारनं पीडित कुटुंबाची सुरक्षा आणखीन वाढवलीय. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दोन पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरवण्यात आलीय. घराच्या प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर लावण्यात आलाय. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येकाचं पत्ता पोलिसांकडून नोंदवण्यात येतोय. घरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. घरातून बाहेर पडण्यापूर्वी पीडित कुटुंबाला पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागत आहे. गावात अतिरिक्त सुरक्षाही तैनात करण्यात आले आहेत.

Exit mobile version