Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

 

पुणे : वृत्तसंस्था । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

“आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं,” मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील यासंबंधी माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.

“आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं सांगितलं. पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version