Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीबीआय पुन्हा सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास करणार

मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने सीबीआय पुन्हा एकदा आत्महत्येच्या दृष्टीनेच या प्रकरणाचा तपास सुरू करीत आहे. दुसऱ्या टप्प्यातील तपासासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून पुन्हा मुंबईत आले आहे.

सुशांतच्या मृत्यूच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधितांची तीन-तीन वेळा चौकशी केली आहे. मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची चार दिवस सलग चौकशी झाली. पण त्यानंतरही सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला, याची कुठलीही ठोस माहिती सीबीआयच्या हाती लागलेली नाही.

पथकाने कूपर रुग्णालयातून सुशांतसिंहच्या मृत्यूचा विस्तृत शवविच्छेदन अहवाल अर्थात ‘व्हिसेरा’चाही अभ्यास केला. ‘एम्स’च्या डॉक्टरांकडे हा अहवाल सोपविण्यात आला. ‘एम्स’च्या डॉक्टरांनीही सकृतदर्शनी ही आत्महत्या असल्याचेच निदान केले आहे. यामुळेच आता ठोस निर्णयाप्रत येण्यासाठी सीबीआय वेगळ्या दृष्टीने तपास करणार आहे.

कुठल्याही निर्णयावर येण्याइतकी माहिती अद्यापही सीबीआयच्या हाती लागलेली नाही. तपास सुरू असतानाच व्हिसेरा अहवालाबाबत ‘एम्स’ने आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेच पथकासमोरील आव्हाने वाढली आहे. ‘एम्स’मधील डॉक्टरांशी सल्लामसलत करून पथक मुंबईत आले आहे. ते आता दुसऱ्या टप्प्यातील तपास सुरू करीत आहेत. यामध्ये ‘एम्स’च्या डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या आत्महत्येसंबंधीचा तपास सीबीआय पथक करणार आहे.

आरोपी रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंहच्या पैशांचा गैरवापर केला, तसेच ते पैसे अन्यत्र वळवले, असा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु नव्या तपासात रियाने या पैशांचा गैरवापर केला की नाही, हे अस्पष्ट आहे. त्यामुळेच सध्या तरी रिया हीच सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत आहे अथवा नाही, याच्या ठोस निर्णयावर सीबीआयचे विशेष पथक आलेले नाही.

Exit mobile version