Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीआरपीएफचे जवान नाशिकचे नितीन भालेराव शहीद

नाशिक: वृत्तसंस्था । छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

नितीन भालेराव हे नाशिकचे असून सहाय्यक कमांडर म्हणून कार्यरत होते. ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात ‘कोबरा २०६’ बटालियनचे १० जवान जखमी झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानानं हलविण्यात आलं. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य सात जवानांवर उपचार सुरू आहेत. दोघांवर चिंतलनार येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नितीन भालेराव यांचं कुटुंब नाशिकच्या राजीव नगर भागात वास्तव्यास आहे. त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईत आणलं जाईल व तेथून ते नाशिकला आणलं जाईल. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून त्यानुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Exit mobile version