Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द या गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉक वर दुचाकी धडकून दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता घडली. विजय मुरलीधर पाटील वय 65 रा. नशिराबाद असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय मुरलीधर पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी खाजगी कामानिमित्ताने विजय पाटील हे एम.एच. 19 6933 या क्रमांकाच्या दुचाकीने रावेर तालुक्यातील पिंपळगाव येथे जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर पोचल्यावर महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी सिमेंटच्या ब्लॉक ठेवण्यात आले. याठिकाणी वळणावर रस्त्यात टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉकचा अंदाज न आल्याने विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर धडकली. अपघातानंतर विजय पाटील हे घटनास्थळी जखमी अवस्थेत पडले होते. या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या वाहनधारकांपैकी एकाने ओळख पटवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या जखमीच्या खिशातील कागदपत्रे तपासले. यात माहिती विजय पाटील असून ते नशिराबाद येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार संबंधित वानधारकाने फोटो मोबाईल वर पाठवून नशिराबाद गावात माहिती कळवली. घटनेची माहिती मिळाल्यावर विजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच जखमी विजय पाटील यांना रुग्णवाहिकेतून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विजय पाटील यांना मयत घोषित केले. शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात विजय पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा , दोन मुली , जावई असा परिवार आहे. या घटने प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version