Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिधुदुर्ग , रत्नागिरीतील कोरोना मृत्यूंना शिवसेनाच जबाबदार ; नारायण राणेंची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था । सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. अशी नारायण  राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

राज्यात  दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. राज्यातील नवीन बाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने लागू केलेले निर्बंधही काही शिथिल केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मात्र असे जरी असले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. यावरून भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे.

“दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.

या अगोदर बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नारायण राणेंची भेट घेतली होती, तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, राणेंनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. 

Exit mobile version