Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिद्धू यांना एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

चंदीगड -लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | सर्वोच्च न्यायालयाने पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम शिक्षा सुनावली आहे. ३४ वर्षापूर्वी सिद्धूंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.

यापूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांना वृद्धाचा मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती. परंतु, आता निकाल बदलल्याने एकतर सिद्धूंना अटक होईल किंवा त्यांना शरण यावं लागेल. दरम्यान, सिद्धूंची पतियाळा तुरुंगात रवानगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सिद्धू सध्या पतियाळामध्ये आहेत. सकाळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या विरोधात हत्तीवरून निदर्शने केली. सिद्धूं यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकरणी शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

सिद्धूंविरुद्धचे हे प्रकरण १९८८ चे आहे. पतियाळा येथे पार्किंगवरून सिद्धूंचे गुरनाम सिंग नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीसोबत भांडण झाले होते. त्यांच्यात हाणामारी झाल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये सिद्धूंनी गुरनाम सिंह यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. नंतर गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी १९९९ मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी २००६ मध्ये उच्च न्यायालायने नवज्योतसिंग सिद्धूला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेविरोधात नवज्योत सिद्धूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १६ मे २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवले होते. यासाठी त्यांनी शिक्षा झाली नाही. केवळ एक हजार रुपयांचा दंड भरून सिद्धूची सुटका करण्यात आली होती.

Exit mobile version