Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सार्वजनिक ठिकाणी पुरुषांना पूर्ण पोशाखाचे बंधन

बागपत ( हरयाणा ) : वृत्तसंस्था । खापचे प्रमुख नरेश टिकैत यांनी पुरुषांनी बाजारांमध्ये हाफ पॅण्ट घालून फिरु नये असं म्हटलं आहे. या आदेशाचं पालन केलं नाही तर सामाजिक स्वरुपाचा दंड करण्यात येईल असंही म्हटलं आहे.

मुलींनी यापूर्वीच मुलांवरही निर्बंध लावण्याची मागणी केली होती असंही नरेश यांनी म्हटलं आहे. यापूर्वी खाप पंचायतीने मुलींनी जीन्स पॅण्ट घालू नये तसेच मोबाईल वापरु नये यासंदर्भात निर्णय दिले होते. या निर्णयांवरुन त्या त्यावेळी चांगला वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या निर्णयांचा विरोध करत खाप पंचायतीवर टीका केली होती.

“वल्लभगढमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. एका मुलीची अशी दिवसाढवळ्या हत्या केली जाते. हे खूपच संतापजनक आहे. अत्याचार दिवसोंदिवस वाढत आहेत. आजकाल अनेक मुली वेगवेगळ्या गावांमधून शाळा कॉलेजांमध्ये जातात. मुलींची छेड काढण्याचे प्रमाणही वाढलं आहे. सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. मुली-सुनांची छेडछाड करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आम्ही कोणतेही फर्मान जारी केलेलं नाही. आम्ही फक्त आमचे मत मांडले आहे,” असं नरेश म्हणाले.

ग्रामीण भागातील मुलांनी हाफ पॅण्ट घालणं अयोग्य आहे असंही नरेश यांनी म्हटलं आहे. मुलांनी हाफ पॅण्ट घालवण्यावर निर्बंध आणावेत असा सल्ला आमच्या वरिष्ठांनी दिला आहे. आम्ही यापूर्वीही खाप पंचायतींच्या माध्यमातून मुलींनी जीन्स घालू नये यासंदर्भात निर्बंध लागू केले होते, असंही नरेश म्हणाले.

शहरांमध्ये मुली जीन्स घालू शकतात. मात्र गावामध्ये हे योग्य वाटत नाही. आम्ही याचा विरोध केला होता आणि आम्हाला यशही मिळालं होतं. याावेळी मुलींनी मुलांवरही आखूड कपडे घालण्यासंदर्भातील नियम लागू करावेत अशी मागणी केली होती. तेव्हा आम्ही मुलांवरही निर्बंध लागू केले, असं नरेश यांनी हा निर्णय घेण्यामागील कारणाबद्दल बोलताना सांगितलं.

नरेश यांच्या या वक्तव्यावर भारतीय किसान महासंघाचे प्रवक्ते आणि नरेश यांचे धाकटे बंधू राकेश टिकैत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या गावामध्ये ३० वर्षांपूर्वी एका व्यक्तीने मिठाई खाण्याची पैंज लावली होती. यासाठी गावामध्ये नग्नावस्थेत फिरण्याची पैंज लावण्यात आलेली, ज्यामुळे नंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच नरेश यांनी ही प्रतिक्रिया दिली. कोणत्याही तरुणावर त्यांनी हाफ पॅण्ट घालण्यासंदर्भात प्रतिबंध लागू केलेला नाही, असं राकेश यांनी स्पष्ट केले

भारतामध्ये स्वातंत्र्याच्या लढा सुरु होता त्याचवेळी पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील गावागावांमध्ये सर्वजातीय आणि सर्व धर्मांतील वरिष्ठ व्यक्तींचा समावेश असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन क्रांती घडवून आणण्याची निर्धार केला. एकीकडे १८५७ मध्ये मेरठमधील लष्करी छावणीत मंडल पांडे यांनी क्रांतीचे बिगुल वाजवलं तर दुसरीकडे मुजफ्परनगरमधील बुलढाणा तहसीलमधील सौरम गावातील खाप चौधऱ्यांनी महा पंचायतची स्थापना करुन इंग्रजांविरुद्ध लढा लढण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी खापची पहिली बैठक झाली होती. यामध्ये हिंदू, मुस्लिमांबरोबरच इतर धर्मातील लोकांचाही समावेश होता. अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनाही त्यावेळी यामध्ये सहभाग नोंदवला होता. २००४ साली खाप पंचाातम्ययतींनी पुन्हा फर्मान जारी करण्यास सुरुवात केली . सगोत्र विवाहांवर निर्बंध लावत एकाच गोत्रामध्ये आणि एकाच गावात प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांची हत्या करण्याचे फर्मान खापने सुनावलं होतं. २०१० साली सिसोली गावातील मुलींनी जीन्स घालू नये हे फर्मानही त्यांनी सुनावलं होतं. त्यानंतर मुलींनी मोबाईल वापरु नये असंही पंचायतीने एका निर्णयामध्ये म्हटलं होतं.

Exit mobile version