Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामान्यांचेही संदेशवहन सरकारच्या नजरेत ; आव्हाडांचा इशारा

 

मुंबई : वृत्तसंस्था । पेगासस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार सामान्यांच्याही संदेशवहनावर नजर ठेऊन असल्याचा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे

 

काही दिवसांपासून पेगॅसस वरून देशभरात चर्चा सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान देखील पेगॅससच्या मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळत आहे. देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांझी यांचा फोन देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून विरोधकांचा विरोध तीव्र होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून लोकांना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर ट्वीटमधून निशाणा साधतानाच सामान्य जनतेला देखील इशारा दिला आहे. “सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

इस्त्रायलमधील एनएसओ गटाने तयार केलेल्या Pegasus Spyware वरून भारतात बराच गदारोळ सुरू आहे. यातून जगभरातल्या लोकांचे फोन हॅक करण्यात आल्याचं समोर आलं असून त्यामध्ये भारतातील ४० जणांचे फोन हॅक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात अनेक राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. पेगॅसस पाळत प्रकरणात इस्राायल सरकारने चौकशी सुरू केली आहे. एनएसओ समूहाच्या कार्यालयांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. या कंपनीच्या स्पायवेअरचा अनेक देशांच्या सरकारांनी गैरवापर केल्याचा आरोप होत असून त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. इस्रायलच्या संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, अनेक विभागांचे अधिकारी एनएसओ कंपनीच्या कार्यालयांत तपासणी करीत आहेत. पेगॅसस पाळतीबाबत ही चौकशी केली जात आहे.

 

Exit mobile version