Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सातारा, ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल, असा विश्वास प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला .

आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेते  रणजित देशमुख  व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या शेकडो समर्थांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,   महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आ. भाई जगताप, सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, सरचिटणीस सचिन सावंत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. ‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन थोरात यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रणजित देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव माण या दुष्काळी भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे. परवाच विलासकाका पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे स्वगृही परतले आणि आज रणजित देशमुख यांच्या रुपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे.

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्याच काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी होऊ शकली. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

रणजित देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंके, बाळासाहेब झेंडे, संतोष पवार, निलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती , माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे, नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Exit mobile version