Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल – अनिल जैन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे नाव सातबारामध्ये लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरूष समानता प्रस्तापित होईल असे प्रतिपादन  जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले. ते ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय १५  वा राष्ट्रीय संवादाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

 

गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे विकास संसद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय १५  वा राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २७  नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यान याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विकास संवाद या संस्थेचे ‘लैंगिक पहचान की चुनौती समानता के सवाल’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले की, आज आपण ज्या जैन हिल्स, गांधीतीर्थ येथे आहोत ते निर्माण करण्यासाठी माझ्या वडिलांना श्रद्धेय भवरलालजी जैन यांना माझी आज्जी गौराई यांनी सात हजार रूपये जी संपूर्ण कुटुंबाची जमापूंजी होती ती दिली. यातून आठ हजार करोड व्यवसायाचा टप्पा गाठणारी कंपनी उभी राहिली. व्यवसायातील पहिली भागीदार आई असे भवरलालजी जैन मानायचे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेचे बाळकडू आम्हाला आपसूक मिळाले.

या राष्ट्रीय संवादात देशभरातील १६ राज्यातून शंभराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विकास संवादचे समन्वयक सचिनकुमार जैन यांनी प्रास्ताविकात विकास संवाद आणि त्यांचे कार्य याबाबत उपस्थितांना परिचय करून दिला. तर डॉ. अश्विन झाला यांनी गांधी तीर्थ व जैन हिल्स बाबतची माहिती दिली. पहिल्या सत्रात रिता भाटिया यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी गांधी विचारांच्या दृष्टीने स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या समजावून सांगितली. सुप्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांनी शब्दांच्या माध्यमातून खान्देश व जळगावची सैर घडवून दिली. पुणे येथील विचारवंत आनंद पवार यांनी ‘लैंगिक पहचान की चुनोती और समानता के सवाल’ अशा दोन भागांमध्ये आपले विचार मांडले. या तीन दिवसीय १५ व्या राष्ट्रीय मिडीया संवाद कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा समारोप गांधी तीर्थ येथील ‘खोज गांधीजी की’ ऑडिओ व्हिडीओ गाईडेड संग्राहलयाच्या अनुभूतीने झाला.

स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमतावर आज मार्गदर्शन

उद्या दि.२६  नोव्हेंबर ला प्रार्थनेने सकाळचे सत्र सुरू होईल. त्यात डॉ. विश्वास पाटील ‘जगदम्बा कस्तूरबा’ यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात दीपा सिन्हा यांचे स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमता यावर महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. अरविंद मोहन याचे ‘हजार बेटियों वाले बापू’ यावर विशेष चर्चा होईल. तर चिन्मय मिश्र हे  ‘बच्चों में लैंगिक पहचान की चुनौतियां’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या संवाद कार्यक्रमाचा समारोप रविवारी, २७ नोव्हेंबर ला होईल.

 

Exit mobile version