Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सागर राणा हत्याकांडात युक्रेनच्या महिलेच्या शोधात पोलीस

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येचा तपास करणारे पोलीस सध्या युक्रेनच्या एका महिलेचा शोध घेत आहेत.

 

हत्येमधील मुख्य आरोपी सुशील कुमार आणि सागर राणा यांच्यात वैर निर्माण होण्यासाठी ही महिला कारणीभूत असल्याची शक्यता आहे. पोलिसांना या महिलेची चौकशी करायची असून सागर राणा आणि सुशील कुमार यांच्यात तसंच त्यांच्या गटात नेमकं कशामुळे फिस्टकलं यासंबंधी महत्वाची माहिती तिच्याकडे असावी असा अंदाज आहे.

 

या महिलेबाबातचं गूढ वाढत असून सुशील कुमारच्या मॉडेल टाऊनमधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास असणारी महिला सध्या कुठे आहे याबाबत तक्रारदार किंवा संशयित यांच्यापैकी कोणालाही माहिती नाही. ही महिला सागर राणाचे मित्र अमित आणि सोनू महल यांच्या ओळखीची होती. फरार गँगस्टर काला जठेडी याची नातेवाईक होती.

 

पोलिसांकडून सोनू महलची चौकशी केली जाणार होती. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. हत्येच्या रात्री सुशील कुमारकडून सोनू महल आणि अमित यांनाही मारहाण करण्यात आली होती. सुशील कुमारसोबत अटक करण्यात आलेला अजय कुमार याला ती महिला आवडू लागली होती. अजयने महिलेसोबत सेल्फी घेतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये पहिला वाद झाला होता.

 

सोनू महलने फ्लॅटवर महिलेचा वाढदिवस साजरा केला असताना सुशीलचा जवळचा मित्र अजय याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं तसंच सेल्फी काढले. यामुळे सोनूचा संताप अनावर झाला आणि त्याने सागरसोबत मिळून आधी अजय आणि नंतर सुशीलसोबत शाब्दिक वाद घातला. सेल्फी घेतल्यामुळे आपला अपमान झाल्यामुळे अजय दुखावला होता. यानंतर त्याने सुशीलला अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त केल्याची माहिती आहे.

 

सुशीलने तोपर्यंत गँगस्टर नीरज बवानासोबत हातमिळवणी केली होती. त्याने सोनू आणि सागरला आपला फ्लॅट रिकामी करण्यास सांगितलं. यामुळे काला जठेडी याचा मात्र संताप झाला, कारण त्याने सुशील कुमारला तो फ्लॅट मिळवण्यात मदत केली होती आणि त्यात शेअर मिळावा अशी त्याची मागणी होती.

 

वाद तेव्हा वाढला जेव्हा सागर राणाने छत्रसाल स्टेडिअममधून ५० ते ६० कुस्तीपटूंना दुसऱ्या आखाड्यात नेलं. सुशील कुमारने छत्रसालमधून बाहेर काढलेली विजेंदर नावाची व्यक्ती तिथे प्रशिक्षण देत होती. सागर आणि विजेंदर यांनी मिळून नांगलोई येथे आखाडा सुरु केली होता, जिथे छत्रसालमध्ये जाणाऱ्या कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिलं जात होतं. यामुळे सुशील कुमारचा संताप झाला होता आणि त्याने सागरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

 

अजय आणि युक्रेनच्या त्या तरुणीच्या प्रकरणानंतर दोन्ही गट एकमेकांचे शत्रू झाले होते. सुशीलने यानंतर सागर, सोनी आणि इतर तिघांचं अपहरण करुन त्यांना ४-५ मे च्या रात्री छत्रसाल स्टेडिअममध्ये आणलं आणि जबर मारहाण केली ज्यामध्ये सागर राणाचा मृत्यू झाला.

 

Exit mobile version