Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सहाय्यक आयुक्तांवर हल्ला करणाऱ्यास कठोर शिक्षा द्या : मनपा कर्मचाऱ्यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी  । ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर दि. ३० ऑगस्ट रोजी जीवघेण्या हल्ला झाला आहे. या हल्ल्याचा जळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करून दोषींवर शीघ्र गती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की,  मंगळवार दि.  ३०  ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक श्रीमती कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग या सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पुर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताला अंगठ्यासह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच  त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे. अंगरक्षक सोमनाथ पालवे याच्या डाव्या हाताचे एक बोट पुर्णपणे तुटून पडले. या दोघांनाही प्रथमता वेदांत रूग्णालय , ठाणे येथे नेण्यात आले. गंभीर दुखापत व जीवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तात्काळ ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे दाखल करण्यात आले.  कल्पिता पिंपळे यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची तुटलेली दोन्ही बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अंगरक्षक सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट रात्री उशीरा १२  वाजेपर्यंत शोध घेऊनही सापडले नसल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे. एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती – पत्नी एकत्रीकरणाला नविन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल ? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत.  कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा हल्ले करतात,तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्लयाने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाने मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्याचा संघटीत निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय आहे.  याकरिता या प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे, मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील, सहायक आयुक्त पवन पाटील, मुख्य लेखा अधिकारी कपिल पवार, प्रभाग अधिकारी उदय पाटील, विलास सोनवणी, बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र पाटील, नगरसचिव सुनील गोराणे आदींच्या स्वाक्षरी आहे. दरम्यान, आज महापालिका कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून दिवसभर कामकाज केले.

 

Exit mobile version