Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सहसचिवांकडून जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात नेहरू युवा केंद्रातर्फे केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय युवा कार्य आणि खेळ मंत्रालयाचे सहसचिव असीत सिंह यांनी ऑनलाईन बैठक घेतली. जळगाव नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी जळगावातील स्वयंसेवकांच्या कार्याची माहिती मांडली असता सहसचिवांनी आणि नेहरू युवा केंद्राचे महासंचालक सौरभ शाह यांनी कार्याचे कौतुक करून प्रशंसा केली.

नेहरू युवा केंद्रातर्फे कोरोना काळात करण्यात आलेल्या कार्याची माहिती घेण्यासाठी युवा कार्य व खेळ मंत्रालयाचे सहसचिव असीत सिंह यांनी ऑनलाईन आढावा बैठक घेतला. बैठकीत नेहरू युवा केंद्राचे महासंचालक सौरभकुमार शाह, संचालक एम.पी.गुप्ता, क्षेत्रीय संचालक भुवनेश जैन, महाराष्ट्र-गोवाचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, गुजरातच्या राज्य संचालक मनीषा शाह यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी सहभागी झाले होते. सहसचिव असीत सिंह यांनी प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन प्रत्येकाने करायचे आहे. समाजात जनजागृती करून लसीकरण अधिकाधिक कसे वाढवता येईल यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करावे, अशा सूचना सिंह यांनी केल्या. नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी माहीती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्राने जिल्हा प्रशासनासोबत विविध कार्यात सहभाग नोंदविला. जिल्हाभरात पथनाट्ये सादर केली. स्वयंसेवकांनी पोलिसांना नाकाबंदीच्या ठिकाणी सहकार्य केले. स्वयंसेवक विकास वाघ यांनी कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले. चेतन वाणी यांनी समाजात सकारात्मक बातम्या पोहचविण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या सहकार्याने लाईव्ह सेमिनार आयोजित केले. प्रत्येक स्वयंसेवकाने भिंतीवर चित्रे काढली, पोस्टर चिकटवून जनजागृती केल्याची माहिती डागर यांनी मांडली. 

 

जळगाव नेहरू युवा केंद्राची माहिती ऐकून सहसचिव असीत सिंह व नेहरू युवा केंद्राचे महासंचालक सौरभकुमार शाह यांनी जळगावचे कौतुक करून प्रशंसा केली.

 

Exit mobile version