Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे

मुंबई : वृत्तसंस्था । दोन महिन्यात किरकोळ बाजारातली महागाई वाढ चिंताजनक आहे. अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असली तरी तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय आज पतधोरण समितीने घेतला. रेपो दर ४ टक्के स्थिर असून सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले.

दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये सुधारणा झाली असली तरी या आढावा बैठकीत व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता धूसर असल्याचे अंदाज जाणकारांनी यापूर्वी व्यक्त केले होते. यानुसार बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवला.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. मागील दोन बैठकीत आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला होता.

मागील दोन महिन्यात किरकोळ महागाईमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा आलेख तूर्त चिंताजनक आहे, असे दास यांनी सांगितले. मात्र खरिपातील शेतमाल बाजारात आल्यास आणि हिवाळी भाजीपाल्याची आवक वाढल्यास महागाई आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित स्तरापेक्षा वरच्या पातळीवर आहे, असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२०मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर नकारात्मक राहिला आहे. मात्र अर्थव्यवस्थेची झपाट्याने सुधारणा होत आहे, असे त्यांनी सांगितले. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्याबाबत बँक कटिबद्ध आहे. चालू तिमाहीत महागाई दर ६.८ टक्के राहील तर चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेची सुधारणा आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रगती यामुळे विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षाचा विकासदर उणे ७.५ टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. याआधीच्या पतधोरणात विकासदराचा उणे ९.८ टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

 

Exit mobile version