Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची दुरूस्ती करा अन्यथा टोलबंद आंदोलन – स्वाभिमानीचा इशारा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरालगतच्या सर्विस रोडवर मागील तीन महिन्यांपासून मोठा खड्डा पडलेला असून या खड्ड्यांमुळे या सर्व्हिस रोडवरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे टोलबंद आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनाचा आशय असा की, राजमार्ग अंतर्गत मुक्ताईनगर सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळीच मोठी दुर्घटना होऊन जीवितहानीही होण्याची शक्यता आहे. या रोडवरील खड्ड्यांची देखभाल दुरूस्ती राजमार्ग प्राधीकरणाच्या कंत्राटदारांकडून तात्काळ दुरूस्त करणे अपेक्षित होते. परंतु, कंत्राटदाराकडुन सदर रोडच्या देखभाल दुरुस्तीकडे हेतूपुरस्कार कानाडोळा केला जात आहे की काय अशी चर्चा परिसरात असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे. निविदा व अटी शर्तीनुसार सदर खड्डा तात्काळ दुरूस्त करणे बंधनकारक असूनसुद्धा शासनाच्या निविदा अटी शर्तीना राजमार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रकल्प संचालकही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत का ? असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे. राजमार्ग प्राधिकरण गोरगरीब जनतेकडून टोल वसूल करण्यासाठी जी सक्ती दाखवते किंवा फास्टॅग नसल्यास दामदुप्पट रक्कम वसूल करण्यात येते याच प्रकारात तीन महिन्यांपासून या खड्ड्यांची दुरुस्ती न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल का ? असा सवाल स्वाभिमानी संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. .राष्ट्रीय राजमार्ग वरील मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील जीवघेणा खड्डा तात्काळ दुरूस्त न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टोल बंद आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा प्रकल्प संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version