Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प ; जळगावसह सहा जिल्ह्यातील सर्व्हेचा निष्कर्ष

 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आयसीएमआर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेत आढळून आहे.

 

राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिकारशक्ती निर्माण करणे, कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक असून प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर अधिक भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली. त्याद्वारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्थांनी तांत्रिक सहकार्य केले.

 

या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांचा तपशील असा:

 

बीड-(एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: ४,पॉझीटिव्ह प्रमाण: १.०१)

परभणी-(एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: ६,पॉझीटिव्ह प्रमाण: १.५१)

नांदेड- (एकूण घेतलेले नमुने: ३९३, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: ५, पॉझीटिव्ह प्रमाण: १.२७)

सांगली-(एकूण घेतलेले नमुने:४००, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: ५, पॉझीटिव्ह प्रमाण: १.२५)

अहमदनगर-(एकूण घेतलेले नमुने:४०४,त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने:५,पॉझीटिव्ह प्रमाण: १.२३)

जळगाव- (एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: २, पॉझीटिव्ह प्रमाण: ०.५)

एकूण: (एकूण नमुने: २३८५, त्यापैकी पॉझीटिव्ह नमुने: २७, पॉझीटिव्ह प्रमाण: १.१३)

Exit mobile version