सर्पदंश टाळण्यासाठी शेतात, घराजवळ वावरताना काळजी घ्यावी : डॉ. संगीता गावित

जळगाव, प्रतिनिधी  । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील ऑगस्ट महिन्यात ११९ व्यक्तीवर सर्पदंश झाला म्हणून उपचार करण्यात आले आहे. सर्पदंश होऊ नये यासाठी शेतात फिरताना, घराजवळ काम करताना काळजी घ्यावी, सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकूण ६२ पुरुष व ५७ महिला अशा ११९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यात २ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात शेतात काम करताना साप निघण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच घरांच्या जवळ असलेले कडेकपारीत देखील साप दडून बसलेले असतात. अशा वेळी काम करताना किंवा वावरताना काळजी घ्यावी लागते. विषारी साप चावले आणि  व्यक्तीला  तत्काळ उपचार मिळाले नाही तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

अशा वेळी जेथे दंश झाला तेथील जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्यानंतर एकदम हलक्या हाताने स्वच्छ कापडाची ड्रेसिंग करावी. ड्रेसिंग घट्ट करू नये. अंगावरील दागिने असतील तर ते काढून ठेवावे. रुग्णाला सरळ झोपवावे. दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीपेक्षा खाली हवा, डोक्याचा भाग उंच हवा. इतर नागरिकांनी, नातेवाईकांनी, रुग्णाला धीर द्यावा व रुग्णालयात आणावे असे आवाहनदेखील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे.

 

Protected Content