Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरस्वती शिशुवाटीकेचे स्नेहसंमेलन उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रमनिष्ठा प्रतिष्ठान संचलित सरस्वती शिशुवाटीकेचा आनंद मेळावा व स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात नुकताच संपन्न झाला. लहान बालकांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद ठरले. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व करसल्लागार किशोर शिंपी,कविता शिंपी यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश नाईक,कृषीसेविका निलिमा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

 

किशोर शिंपी यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनेश नाईक,कविता शिंपी,निलिमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लहान बालकांनी आपल्या पालकांच्या मदतीने खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते रविंद्र पाटील (पाचोरा),अनिता पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तहसिलदार श्री.पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण दिल्याने लहान वयात बालकांचा पाया पक्का होण्यास मदत होते. त्यातूनच यशाची इमारत उभी राहू शकते. इंग्रजी ही इतर देशांशी व्यवहार व संपर्काची भाषा आहे. पण मातृभाषेतून शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी पूरक ठरते असे सांगत शिशुवाटीकेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध व्याख्याते रविंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात शुवाटीकेच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. लहान मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार देणे आवश्यक असून यात शाळांची भुमिका महत्त्वाची आहे असे सांगितले. संस्कृती टिकली तरच देश टिकेल यासाठी लहान वयापासून देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार दिले जावेत. कुटुंब व विद्यालय यांना यासाठी कार्य करावे लागेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थी वर्गाने गित गायन,नृत्य,समूह नृत्य,मिमीक्री,फॅन्सी ड्रेस असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास पालक,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी आरती नाईक,किरण भदाणे,आरती साळी,.अर्चना कुंभार, आराध्या दुबळे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version