Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरपंचपदाचा लिलाव लोकशाहीला काळीमा ! — संजय ओंकार वाघ

 

पाचोरा, प्रतिनिधी। राज्यातील दोन गावांमध्ये सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला असून हि घटना लोकशाहीसाठी काळीमा ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरपरिषद गट नेते संजय ओंकार वाघ यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी चक्क २ कोटी ५ लाख रुपयांची आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी माता मंदिराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. हा सरपंच पदाचा लिलाव म्हणजे लोकशाहीची थट्टा ठरणार असून भविष्यात याचे पडसाद उमटतील. प्रामाणिकपणे गावाच्या विकासाचे भविष्य पाहणारा एखादा ग्रामीण भागातील सुशिक्षित उमेदवार या पैशांच्या बाजारात केवळ तुच्छच लेखला जाईल अशी भीती श्री. वाघ यांनी व्यक्त केली आहे. केवळ पैशांच्या बळावर ही समाजात प्रतिष्ठेची समजली जाणारी पदे विकत घेतली जातील. आज प्रथमदर्शनी मंदिर बांधकाम सारख्या पवित्र कामासाठी हे पैसे दिले जात असले तरी पैसे देणारा उमेदवार येणाऱ्या पाच वर्षात जनतेसाठी आणि गावाच्या विकासासाठी न झटता गेलेला पैसा परत मिळविण्यासाठी प्रयत्न करेल अशी भीती व्यक्त केली आहे. आतातरी जनतेने सारासार विचार करून अशा लोकशाहीला मारक ठरणाऱ्या घटनांना विरोध दर्शविला पाहिजे. घोडेबाजार टाळावा म्हणून सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न करता आणि लोकनियुक्त सरपंचपद जाहीर न करण्याचा निर्णय घेणाऱ्या सुज्ञ निवडणूक आयोगाने गंभीरपणे या घटनांची दखल घेऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांची जोपासली जाईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Exit mobile version